Vijaykumar Dudhale
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली.
धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्यातून भाजपकडून लोकसभा लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र त्यांना पक्षाने तिकिट न दिल्याने मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली.
लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपचे आमदार असलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजप आणि राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारापासून अलिप्त होते. धैर्यशील यांच्या प्रचाराचे नियोजन रणजितसिंह यांनी केल्याचा भाजपचा आरोप आहे.
माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा तब्बल सव्वा लाखाच्या फरकाने पराभव करत लोकसभा निवडणुकीत निवडून आले.
माढ्यातील पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी भाजपने फलटणमध्ये बैठक घेतली. त्यात बैठकीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचे काम न केल्याबद्दल हल्लाबोल करण्यात आला.
भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील यांना आमदार केलं. त्यांच्या बंद पडलेल्या साखर कारखान्याला मदत केली. पण निवडणुकीत त्यांनी पक्षापेक्षा घराला प्राधान्य दिले, असा आरोप सातारा जिल्हा भाजपचे सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी केला.
भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उघडपणे प्रचार केला, त्यांच्यावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर पक्षशिस्तीची कारवाई करावी. त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई न केल्यास भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल आणि भविष्यात सोलापूर जिल्ह्यात भाजपला फटका बसेल, अशी भीतीही या बैठकीत व्यक्त करण्यात आली.