Pradeep Pendhare
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने 2025-26 या वर्षासाठी 100 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर केला.
या निधीतून नवीन रुग्णवाहिका खरेदी तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे.
वित्त विभागाच्या मंजुरीनंतर राज्यातील रुग्णवाहिकांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवून 1756 पर्यंत नेण्याचे नियोजन आहे.
महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या 108च्या सेवेत 937 रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
पहिल्या टप्प्यात 200 रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात येणार असून त्यामध्ये दोन एअर रुग्णवाहिका आणि पाच सागरी बोट रुग्णवाहिकांचा समावेश आहे.
अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका, बेसिक लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका, नवजात शिशूंसाठी विशेष रुग्णवाहिका, फर्स्ट रिस्पॉन्डर बाइक, सागरी बोट रुग्णवाहिका यांचा समावेश असणार आहे.
या नवीन रुग्णवाहिका मोबाईल डेटा टर्मिनल, टॅबलेट पीसी, जीपीएस, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही आणि ट्रायएज प्रणालीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील.
आरोग्य विभागाने ईएमएस 108 अंतर्गत आधुनिक आणि अत्याधुनिक रुग्णवाहिकांसाठी ‘सुमीत एसएसजी बीव्हीजी महाराष्ट्र ईएमएस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीशी दहा वर्षांचा करार केला आहे.