Rajanand More
राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यासोबतच पक्षांतरालाही ऊत आला आहे.
राज्यात सर्वात मोठ्या असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चुरस असणार आहे. पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तास आधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा राखी जाधव यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंसोबत युती केली असून यामध्ये कमी जागा मिळत असल्याने जाधव नाराज असल्याची चर्चा होती. त्यातूनच त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा आहे.
मुंबईत शरद पवारांच्या पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पक्षाच्या महापालिकेतील गटनेत्या तसेच तीनवेळा नगरसेवकही राहिल्या आहेत.
एकसंध राष्ट्रवादीमध्ये राखी जाधव हे मुंबईच्या कार्याध्यक्षही होत्या. त्यामुळे त्यांचे मुंबईतील महत्व लक्षात येते. नबाव मलिकांना अटक झाल्यानंतर त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती.
पक्षात फूट पडल्यानंतर त्या शरद पवारांसोबत राहिल्या. त्यानंतरच्या मेळाव्यात तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निष्ठा कशी असते हे राखीताईंकडे पाहून कळते, असे कौतुक केले होते.
राखी जाधव यांना भाजपकडून घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३१ मधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.