Rajanand More
नियमित बचत आणि चालू खात्यांसाठी बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम असणे आवश्यक आहे. बँक खात्यात किमान शिल्लक नसल्यास खातेधारकाकडून शुल्क आकारले जाऊ शकते.
खात्यात किमान शिल्लकची कटकट थांबवायची असल्यास तुम्ही बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खाते उघडू शकतात. त्यामध्ये जनधन खात्यांचाही समावेश आहे.
BSBD खात्यांमध्ये किमान रक्कम ठेवण्याची गरज नाही. फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड किंवा फॉर्म क्र. 60 द्वारा सहजपणे खाते उघडण्याची सुविधा बँकांकडून दिली जाते.
बीएसबीडी खाते कोणीही व्यक्ती उघडू शकते. यामध्ये वय आणि उत्पन्नाचा काहीही संबंध नाही. याशिवायहे खाते कोणत्याही प्रारंभिक ठेवींशिवाय उघडले जाते. यामध्ये किमान रक्कमेची गरज नाही.
खातेधारकाने मागणी केल्यास त्यानुसार सामान्य बचत खाते बीएसबीडी खात्यामध्ये बदलले जाऊ शकते. त्यामुळे नव्याने दुसरे खाते काढण्याची आवश्यकता नाही.
खातेधारकांना एटीएम -कम -डेबिट कार्ड सारख्या बँकिंग सुविधा विनाशुल्क दिल्या जातात. खात्यामध्ये कितीही वेळा रक्कम जमा केली जाऊ शकते.
बीएसबीडी खातेधारक दर महिन्याला जास्तीत जास्त चार वेळा विनाशुल्क पैसे काढू शकतात. एटीएम मधून पैसे काढणे, आरटीजीएस/ एनईएफटी/ क्लीयरिंग/ इंटरनेट डेबिट्स/ स्थायी सूचना/ ईएमआयज इ. द्वारा हस्तांतरणाचा समावेश आहे.
बीएसबीडी खातेधारक त्याच बँकेत पुन्हा नेहमीचे बचत खाते उघडू शकत नाही. अन्य बँकेत नियमित बचत खाते उघडता येऊ शकते.