सरकारनामा ब्यूरो
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्ट हा महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्याशिवाय प्रवास करणे शक्य होत नाही.
कोणत्याही व्यक्तींना परदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट हा दस्तावेज आवश्यक आहे. पासपोर्ट तयार करण्याच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने काही बदल केले आहेत, ते कोणते जाणून घ्या...
यात ज्या मुलांचा जन्म 1 ऑक्टोबर 2013 ला किंवा नंतर झाला आहे, अशा सर्वांचा पासपोर्ट तयार करण्यासाठी त्यांच्या जन्मतारखेची खात्री करण्यासाठी 'जन्मदाखला प्रमाणपत्र' जोडणे अनिवार्य असणार आहे.
जन्मदाखल्यासोबत पूर्वीप्रमाणे एसएससी बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना ही ओळखपत्रे ही सादर केली जाऊ शकतात.
पूर्वी पासपोर्ट धारकाचा पत्ता हा त्याच्या शेवटच्या पानावर छापला जात होता. मात्र, आता त्याऐवजी बारकोड छापला जाणार आहे. हा 'बारकोड' स्कॅन करून पासपोर्ट धारकाच्या पत्याची माहिती मिळेल.
शेवटच्या पानावर पासपोर्टधारकांच्या पालकांची नावे आता छापली जाणार नाहीत. यामुळे एक पालक आणि विभक्त कुटुंबातील मुलांना दिलासा मिळणार आहे. तसेच या माहितीबाबत गोपनीयता राखली जाईल.
पासपोर्टचे वर्गीकरण करणे सोपे जावे, यासाठी कव्हर वेगवेगळ्या कलरमध्ये तयार केले जाईल. पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट अधिकाऱ्यांसाठी, लाल राजकीय नेत्यांसाठी तर, नागरिकांसाठी निळ्या रंगाचा पासपोर्ट असेल.
पासपोर्ट तयार करणाऱ्या सेवा केंद्रांची संख्या पुढील पाच वर्षात 442 वरून 600 पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.