Rashmi Mane
अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि कंझर्वेटिव्ह कार्यकर्ते चार्ली कर्क यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.
ओरेम (युटा) येथील युटा वॅली युनिव्हर्सिटीमध्ये बुधवारी ते कंझर्वेटिव्ह विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात भाषण करत होते. त्याचवेळी एका हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला.
कर्क यांना गळ्याला गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या 31 व्या वर्षीच त्यांनी त्यांचे आयुष्य गमावले आहे.
चार्ली कर्क हे युवकांमध्ये लोकप्रिय असलेले कार्यकर्ते होते. तसेच ते ‘टर्निंग पॉइंट यूएसए’ या संघटनेचे सह-संस्थापक आणि सीईओ होते.
कर्क यांनी केवळ 18 व्या वर्षी या संस्थेची स्थापना केली होती. 2016 च्या रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये दिलेल्या त्यांच्या भाषणामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी रिपब्लिकन पक्षासाठी अनेक निवडणुकांत सक्रिय काम केलं.
कर्क यांचा लवकरच ‘अमेरिकन कमबॅक टूर’ या नावाने राष्ट्रीय दौरा सुरू होणार होता. या दौऱ्यात ते देशभरातील विद्यापीठांमध्ये युवकांशी चर्चा व डिबेट करणार होते.
मागच्या दशकात कर्क रिपब्लिकन पक्षातील एक उदयोन्मुख स्टार म्हणून पुढे आले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा चाहता वर्ग तयार केला होता.
संघटनेने स्विंग-स्टेट्समध्ये रिपब्लिकनसाठी जनमत वळवण्यात मोलाचं योगदान दिलं होतं. त्यांचा अकाली मृत्यू हा अमेरिकेतील कंझर्वेटिव्ह चळवळीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.