Rashmi Mane
ऑक्टोबर महिना अर्धा संपला असतानाही महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही, त्यामुळे अनेक महिला चिंतेत आहेत. “ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?” हा प्रश्न राज्यातील लाखो महिलांच्या मनात घर करून बसला आहे.
दरम्यान, महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरचा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये वितरित केला जाण्याची शक्यता आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप अधिकृत तारखेची घोषणा झाली नसली तरी मंत्री आदिती तटकरे लवकरच यासंदर्भात मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.
तथापि, ऑक्टोबरचा हप्ता केवळ पात्र महिलांनाच मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सध्या सुरु आहे. या प्रक्रियेत अनेक अर्ज बाद करण्यात आले आहेत.
पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे ज्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत, त्यांना हा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे.
याशिवाय, महिलांसाठी केवायसी (KYC) प्रक्रिया आता अनिवार्य करण्यात आली आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
सरकारने KYC साठी दोन महिन्यांचा कालावधी दिला असून नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागातील महिलांना मात्र 15 दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे.
अनेक महिलांना KYC करताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने विभागाने त्यावर तोडगा काढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरून न जाता आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर KYC पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्त्यांपासून त्यांचा लाभ थांबू शकतो.