Rajanand More
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे रविवारी (ता. २३ नोव्हेंबर) सेवेतून निवृत्त होत आहेत. शुक्रवारी (ता. २१) त्यांच्या कामकाजाचा अखेरचा दिवस होता. त्यानिमित्त सुप्रीम कोर्टात निरोप समारंभाचे आयोजन केले होते.
भावी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासह इतर न्यायाधीश व ज्येष्ठ वकिलांनी सरन्यायाधीश गवई यांचे कौतुक केले. त्यामुळे सीजेआय भारावून गेले होते.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, तुम्ही सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासोबत, निकालांमध्ये भारतीयतेची एक नवीन झलक येऊ लागली आहे.
सीजेआय गवईंनी गुरूवारीच विधेयके मंजूर करण्याबाबत राज्यपालांच्या कालमर्यादेबाबत ऐतिहासिक निकाल दिला आहे. मेहता यांच्या विधानावर लगेच सरन्ययाधीशांनी या निकालाचा संदर्भ दिला.
सीजेआय गवई म्हणाले, आम्ही राज्यपालांच्या निकालामध्ये एकाही विदेशी निकालाचा संदर्भ घेतला नाही. आम्ही स्वदेशी संदर्भानुसार निकाल दिले.
एक वकील, न्यायाधीश आणि सरन्यायाधीश म्हणून मी कधीही हे पद सत्तेचे पद मानले नाही. समाज आणि देशाची सेवा करण्याची एक संधी म्हणून त्याकडे पाहिल्याचे सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.
एक न्यायमूर्ती म्हणून मला अशा अनेक प्रकरणांचा निकाल देण्याची संधी मिळाली, जे माझ्या जिव्हाळ्याचे विषय होते. पर्यावरण, इकोलॉजी, वन्यजीव हे माझ्या जिव्हाळ्याचे विषय आहेत, असे CJI म्हणाले.
सुप्रीम कोर्ट एक संस्था असून सीजेआय म्हणून मी जे निकाल दिले ते आपल्या सन्माननीय सहकारी न्यायमूर्तींच्या सल्ल्याने दिल्याचे सीजेआय गवई यांनी सांगितले.