Rajanand More
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कॉकरोच टिप्पणीनंतर सोशल मीडियात कॉकरोज जनता पार्टी (CJP) या नावा एक अकाऊंट सुरू करण्यात आले आहे. मागील पाच दिवसांत CJP ला कोट्यवधी लोकांनी फॉलो केले आहे.
अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेले अभिजीत दीपके यांनी सीजेपी या व्हर्च्यूअल पक्षाची स्थापना केली आहे. यामाध्यमातून आपण तरूणाईच्या मनातील भावना लोकांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दीपके यांनी गंमतीगमतीत सुरू केलेला हा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. त्यांनी लोकांसमोर पाच मुद्दे ठेवले असून २०२९ साठी हे मुद्दे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सत्ता आल्यास कोणते निर्णय घेतले जातील, याची माहिती दिली आहे.
CJP सत्तेत आल्यास कोणत्याही सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर बक्षीस म्हणून राज्यसभेचे सदस्यत्व दिले जाणार नाही.
कोणतेही वैध मत हटवले गेले तर मुख्य निवडणूक आयुक्तांवर (CEC) UAPA अंतर्गत कारवाई करून त्यांना अटक केली जाईल. नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेणे हे दहशतवादापेक्षा कमी नाही.
महिलांना ३३ टक्के नव्हे तर थेट ५० टक्के आरक्षण दिले जाईल. त्यासाठी संसद सदस्यसंख्या वाढविली जाणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळातही महिलांसाठी ५० टक्के पदे राखीव असतील.
अंबानी आणि अदानी यांच्या मालकीच्या सर्व मीडिया संस्थांचे परवाने रद्द केले जातील. खऱ्या अर्थाने स्वतंत्र माध्यमांना संधी दिली जाईल. ‘गोदी मीडिया’ अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी करू.
कोणताही आमदार किंवा खासदाराने पक्षांतर केल्यास त्यांना पुढील २० वर्षे निवडणूक लढवण्यास आणि कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घातली जाईल.