Rajanand More
सोशल मीडियात अजूनही कॉक्रोच जनता पार्टीचाच दबदबा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अभिजीत दिपके यांनी या पार्टीची सुरूवात केल्यानंतर काही दिवसांतच इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्स झाले होते.
डेटा बीइंग्सने इन्स्टाग्रामवरील एंगेजमेंटचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये, CJP ने मोठी मजल मारल्याचे दिसून आले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मागील काही दिवसांत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी रान उठविले आहे. सातत्याने आंदोलन करत आहेत. पण त्यानंतर ते सीजेपीच्या मागे पडले आहेत.
विश्लेषणानुसार, १० ते १६ ऑक्टोबर दरम्यान ट्रॅक केलेल्या १० राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या एकूण एंगेजमेंटपैकी २५ टक्के म्हणजेच २ कोटी १७ लाख एंगेजमेंट सीजेपीला मिळाली आहे.
काँग्रेस २ कोटी ५ लाख एंगेजमेंटसह दुसऱ्या स्थानावर, तर राहुल गांधी हे १ कोटी ४६ लाख एंगेजमेंटसह तिसऱ्या स्थानावर आहेत. विश्लेषणामध्ये दहा खात्यांच्या एकूण ८ कोटी ७८ लाख एंगेजमेंटचा समावेश होता.
सोशल मीडियात इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत अधिक सक्रीय समजल्या जाणारे भाजप इन्स्टाग्रामवरील एंगेजमेंटमध्ये या कालावधीत थेट पाचव्या स्थानावर राहिले. भाजपच्या खात्यात केवळ ५० लाख एंगेजमेंटची नोंद झाली आहे.
विश्लेषणानुसार इंडियन युथ काँग्रेस चौथ्या स्थानावर तर एनएसयूआय सहाव्या स्थानावर आहे. त्यांना अनुक्रमे ७४ लाख आणि १८ लाख एवढी एंगेजमेंट मिळाली.
आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना १४ लाख एंगेजमेंट मिळाली आहे. त्यांच्या खालोखाल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आहेत. त्यांना १२ लाख एंगेजमेट मिळाल्याचे विश्लेषणातून समोर आले आहे.