Mangesh Mahale
सोशल मीडियावर सध्या Cockroach Janta Party (CJP) पक्षाची आणि त्याच्या वाढत्या फॉलोअर्सची जोरदार चर्चा सुरू आहे.
ते निवडणूक लढवील का? राजकीय पक्ष कसा स्थापन होतो, त्याचे नियम काय आहेत आणि राष्ट्रीय-राज्य पक्षांमध्ये काय फरक असतो हे या निमित्ताने जाणून घेऊयात.
भारतातील कोणताही नागरिक किंवा नागरिकांचा समूह राजकीय पक्ष स्थापन करू शकतो. यासाठी कोणती विशेष पात्रता आवश्यक नाही.
भारतात राजकीय पक्षाची अधिकृत नोंदणी लोकप्रतिनिधी कायदा, 1951 (Representation of the People Act, 1951) च्या कलम 29 अ (Section 29A) अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाकडे (ECI) केली जाते.
पक्षाच्या स्थापनेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे नोंदणीसाठी अर्ज सादर करावा लागतो. 30 दिवसांनंतर आलेले अर्ज स्वीकारले जात नाहीत.
पक्षाच्या नावामध्ये जात किंवा धर्माचा उल्लेख नसावा. पक्षाच्या घटनेत (Constitution) स्पष्ट लिहावे लागते की, पक्ष भारतीय संविधानाचा, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीच्या तत्त्वांचा आदर करेल.
अर्ज केल्यानंतर, प्रस्तावित पक्षाचे नाव दोन राष्ट्रीय आणि दोन प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये जाहीर करून जाहिरात द्यावी लागते. या नावावर कोणाची हरकत असल्यास ती ३० दिवसांत निवडणूक आयोगाकडे नोंदवावी लागते.
अर्जासोबत 10,000 चा डिमांड ड्राफ्टपक्षाची स्वाक्षरी केलेली घटना, पक्षाचे स्वतंत्र बँक खाते, पॅन (PAN) कार्ड आणि किमान 100 नोंदणीकृत मतदारांचे प्रतिज्ञापत्र (Affidavit) जोडावे लागते.
निवडणूक आयोगाच्या 'निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, १९६८' नुसार, फक्त नोंदणी झाल्याने कोणी राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष बनत नाही. त्यासाठी निवडणुकांमध्ये विशिष्ट कामगिरी करावी लागते.