Rajanand More
मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी स्वप्निल वानखडे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांचा एका अनाथ मुलीसोबतच्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
IAS वानखडे हे मराठमोळे असून मुळचे अमरावतीचे आहेत. 2016 च्या तुकडीचे मध्य प्रदेश केडरचे अधिकारी. कार्यक्षम अधिकारी म्हणून राज्यात ओळख.
नुकत्याच झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या जनसुनावणीला एक अनाथ मुलगी आली होती. तिने आपल्या तीन भावंडांसह शिकण्याची आणि मदतीची इच्छा व्यक्त केली.
मुलीचे गाऱ्हाणे ऐकताच वानखडे यांनी सुनावणी सुरू असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. चौघाही भावंडांना शासकीय योजनेतून प्रत्येकी चार हजार रुपये मदत आणि शाळेत प्रवेश देण्याच्या सूचना.
दातिया जिल्हा प्रशासनाने या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. त्याला हजारो लाईक्स मिळाल्या असून अनेकांनी शेअरही केला आहे. तसेच वानखडे यांचे अनेकांनी कौतुकही केले आहे.
वानखडे यांनी यापूर्वी जबलपूरचे आयुक्त, रेवाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशी पदे भूषविली आहे. प्रशासनावर चांगली पकड असलेला अधिकारी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे.
सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून वानखडे यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला अन् चौथ्या प्रय़त्नात त्यांना यश मिळाले. 132 वी रँक मिळवत ते IAS बनले.
आयुक्त असताना त्यांनी जुन्या, भंगारातील बसेसचा कायापालट केला होता. या बसेसचा वापर विविध लोकोपयोगी कामांसाठी सुरू केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही पाठीवर कौतुकाची थाप टाकली होती.