Rajanand More
तेलंगणातील माजी आमदार दानम नागेंद्र यांची सध्या देशभर चर्चा होत आहे. तेलंगणा हायकोर्टाने नुकतीच त्यांना अपात्र ठरविले आहे. सुप्रीम कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केले.
दानम नागेंद्र हे खैरताबाद विधानसभा मतदारसंघातून २०२३ मध्ये भारत राष्ट्र समितीच्या तिकीटावर निवडून आले होते. पण पाच महिन्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीने त्यांचा घात केला.
बीआरएसचे आमदार असताना त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढविली. पण त्यांचा पराभव झाला. मात्र, या निवडणुकीने त्यांची आमदारकीही घालवली.
काँग्रेसकडून निवडणूक लढविल्याने नागेंद्र यांच्याविरोधात बीआरएसकडून आधी विधानसभा अध्यक्ष आणि नंतर हायकोर्टात अपात्रता याचिका दाखल करण्यात आली. हायकोर्टाने त्यांना नुकतेच अपात्र ठरविले.
हायकोर्टाच्या निकालाविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण इथेही दिलासा मिळाला नाही. तुमची केस म्हणजे आयाराम, गयाराम आणि आयाराम अशी आहे, अशी टिप्पणी करत कोर्टाने याचिका फेटाळली.
नागेंद्र हे मुळचे काँग्रेसचे नेते असून ते पहिल्यांदा २००९ मध्ये आंध्र प्रदेश विधानसभेत दाखल झाले. २०१४ च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला आणि त्यांनी २०२८ मध्ये बीआरएस मध्ये प्रवेश केला.
टीआरएसच्या तिकीटावर ते खैरताबाद मतदारसंघातून २०१८ आणि २०२३ च्या निवडणुकीत सलग दोनदा निवडून आले होते. त्यामुळे या भागात त्यांचा चांगलाच दबदबा आहे. मात्र, त्यांची ही टर्म अधिकृतपणे एप्रिल २०२४ पर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे.
कोर्टाचा निकाल मान्य करत नागेंद्र यांनी आता पोटनिवडणुकीत पुन्हा विजय मिळवून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.