Rajanand More
उत्तर प्रदेश काँग्रेसमधील वाद नुकताच चव्हाट्यावर आला. मावळते प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि नगरसेविका ममता चौधरी यांच्यामध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहण समारंभातच वाद झाला.
राय यांनी आपल्या औकातीत राहून बोलायचं, असे म्हटल्याचा आरोप चौधरींनी केलाय. तसेच आपल्यावर चपलाही फेकण्यात आल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
लखनौमधील प्रदेश कार्यालयात झालेला हा वाद राय यांच्याही जिव्हारी लागल्याची चर्चा आहे. पद जाताच पक्षातील नेत्यांकडून दुजाभाव सुरू झाल्याने ते नाराज असून पक्ष सोडू शकतात, या चर्चांना उधाण आले आहे.
ममता चौधरी या प्रदेश काँग्रेसच्या नेत्या असून सध्या लखनौ महापालिकेत नगरसेविका आहेत. त्या महिला प्रदेश काँग्रेसच्या सेंट्रल यूपीच्या अध्यक्षही होत्या.
अजय राय यांनी प्रदेशाध्यक्ष असताना वर्षभरापूर्वी महिला काँग्रेसची संपूर्ण कमिटी बरखास्त केली होती. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू असल्याची चर्चा आहे.
चौधरी या मागील दोन दशकांपासून लखनौ शहर काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. २००६ मध्ये त्यांनी लखनौ महापालिकेची पहिली निवडणूक लढविली होती. तेव्हापासून सलग चारवेळा त्या निवडून आल्या आहेत.
प्रियांका गांधी यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी 'लडकी हूं, लड सकती हूं' या मोहिमेअंतर्गत चौधरी यांना मोहनलालगंज मतदारसंघातून तिकीट दिले होते. मात्र, पराभव झाला.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक असून या निवडणुकीसाठी चौधरी यांचीही तयारी सुरू आहे. थेट अजय राय यांच्यासोबत वादावादी झाल्याने प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.