Rajanand More
काँग्रेस पक्ष हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष असून भाजपनंतर सर्वात मोठी राजकीय ताकद याच पक्षाची आहे. मात्र, मागील काही वर्षांत पक्षाला विविध माध्यमातून मिळणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी घट झाली आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये काँग्रेसला २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांतून १३० कोटी ६९ लाख रुपये मिळाले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही रक्कम तब्बल ७५ टक्क्यांनी कमी आहे.
काँग्रेसच्या देणग्यांमध्ये यंदा दशकातील सर्वात मोठी वार्षिक घट झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी २०१५-१६ मध्ये देणग्यांमध्ये सुमारे ८६ टक्क्यांची घसरण झाली होती.
काँग्रेसला २०२३-२४ मध्ये काँग्रेसला २८१ कोटी ४८ लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या आर्थिक वर्षात ही रक्कम ५१७ कोटी ३९ लाख रुपयांवर पोहोचली होती.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भाजपला २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांमधून तब्बल ६ हजार ७४ कोटी २ लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांच्या तुलनेत ही रक्कम जवळपास १२ पट अधिक आहे.
प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून मिळणाऱ्या निधीत मोठी घट झाल्याने काँग्रेसच्या एकूण देणगीवर परिणाम झाला आहे. २०२४-२५ मध्ये ट्रस्टकडून २१६ कोटी ३४ लाख रुपये मिळाले होते. २०२५-२६ मध्ये ही रक्कम तब्बल ८८ टक्क्यांनी घटली.
२०२५-२६ मधील देणग्या घटल्या असल्या, तरी तपासलेल्या काँग्रेसची सर्वात कमी देणगी नाही. २०२०-२१ मध्ये ७४.५२ कोटी, २०२१-२२ मध्ये ९५.४६ कोटी आणि २०२२-२३ मध्ये ७९.९२ कोटी रुपये देणग्या मिळाल्या होत्या.
देणग्यांच्या आकडेवारीत पक्षाचे संपूर्ण उत्पन्न समाविष्ट नसते. सदस्यत्व शुल्क, कूपन विक्री, लहान देणग्या आणि व्याज यातूनही पक्षाला उत्पन्न मिळते. २०२४-२५ मध्ये काँग्रेसला केवळ कूपन विक्रीतून ३५०.१२ कोटी रुपये मिळाले होते.