Rajanand More
उत्तर प्रदेश सरकारमध्ये उपआयुक्त (जीएसटी) पदावर कार्यरत असलेल्या अनुपमा राग यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.
अनुपमा यांनी सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करून स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय जाहीर केला. भविष्यात नव्या संकल्पासह नवीन प्रवास सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनुपमा राग या समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अनुराग भदौरिया यांच्या त्या पत्नी आहेत. त्यामुळे त्या समाजवादी पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा रंगली आहे.
सीतापूर जिल्ह्यातील सिधौली विधानसभा मतदारसंघातून त्यांना समाजवादी पक्षाची उमेदवारी मिळू शकते. अद्याप त्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यांचे पती अनुराग यांनीही लखनऊ पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
अनुपमा यांच्या आई सुशीला सरोज या २००४ मध्ये लखनऊमधील मोहनलालगंज लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. मुलायम सिंह यादव यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते.
अनुपमा राग यांचे वडील राम प्रकाश सरोज हे १९६४ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यामुळे अनुपमा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित आहे.
प्रशासकीय सेवेत काम करण्यासोबतच अनुपमा राग यांची ओळख गायिका म्हणूनही आहे. त्यांच्या गायनाच्या आवडीमुळे या क्षेत्रातही त्यांना नाव कमावले आहे.
प्रशासकीय सेवेतून सार्वजनिक जीवनाकडे टाकलेले हे पाऊल केवळ नवीन भूमिका नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी नव्या पद्धतीने पार पाडण्याचा संकल्प असल्याचे अनुपमा राग यांनी राजीनाम्यावर भावना व्यक्त केली आहे.