Deepak Kulkarni
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे वादाच्या भोवर्यात सापडले आहेत.
त्यांनी शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात प्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे नवा वाद पेटला आहे.
राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते असे विधान केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत होती.
ठाण्यात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करणारे ट्विट केले. त्यात त्यांनी जोरदार हल्ला चढविला आहे.
तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आमदार आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद बंगला या निवासस्थानाबाहेर जमून जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी कार्यकर्ते महाआरती करून आव्हाड यांचा निषेध नोंदविण्याच्या तयारीत असताना वर्तकनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
यानंतर अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली.
नरेश म्हस्के यांनी याच मुद्द्यावरुन ठाकरे पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे. तसेच तुमच्या हिंदुत्वाशी अगदी बरोबर नाळ जोडतायत ना, असा चिमटाही म्हस्के यांनी काढला आहे.