सरकारनामा ब्यूरो
500 वर्षा नंतर सरयू नदीच्या काठावर प्रथमच प्रभु श्रीराम हे अयोध्येत विराजमान झाले आहेत. त्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच 25 लाख मातीच्या दिव्यांनी नगरी उजळून निघाली.
22 जानेवारीला श्रीरामांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर हा पहिला दीपोत्सव होता. या दीपोत्सवाची नोंद 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये करण्यात आली.
जास्तीत जास्त दिवे लावणे आणि सामूहिक आरती करण्याचा विक्रम बुधवारी झाला.एकाच वेळी मातीचे दिवे लावून 1121 वेदाचार्यांनी मिळून सरयू नदीकाठी आरती केली.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी प्रवीण पटेल यांनी देखील अयोध्येत हाजेरी लावली होती. त्यांनी हे प्रमाणपत्र योगींकडे सोपवले.
अयोध्या नगरीत भव्य रथ यात्रा काढण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी रामललाचा रथ ओढला. भगवान श्री राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानांची सरयू नदीकाठी आरती केली.
यूपी टुरिझम, यूपी सरकार अयोध्या जिल्हा प्रशासन आणि डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठासह स्थानिक नागरिकांनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला.
अयोध्येतील यंदाची दिवाळी ऐतिहासिक ठरली आहे. राम मंदिराच्या उभारणीनंतरचा हा पहिलाच दीपोत्सव असल्याने प्रत्येकजण भारावून गेला होता.
दीपोत्सवामध्ये लेझर शोची पर्वणीही पाहायला मिळाली. लेझर शोच्या माध्यमातून श्रीरामांची प्रतिमा साकारण्यात आली होती.