Rajanand More
बिस्मा फरीद ही दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज महाविद्यालयात इंग्लिश ऑनर्स विषयाचे शिक्षण घेत आहे. तिने ‘लिंक्डइन’वर एक पोस्ट शेअर करत धक्कादायक वास्तव मांडलं आहे.
बिस्मा कॉलेजमध्ये टॉपर होती. तिला जवळपास 50 प्रमाणपत्र, 10 मेडल, 10 ट्रॉफी मिळाल्या आहेत. त्याचा फोटोही तिने पोस्ट केला आहे. तिची ही पोस्ट आता सोशल मीडियात व्हायरल होतेय.
बिस्मा हिने पोस्टमध्ये इंटर्नशिपासाठी दिलेल्या मुलाखतीत आलेला अनुभव सांगितला आहे. मुलाखतीत तिला गुणांविषयी नव्हे तर तिच्यातील कौशल्यांविषयी विचारण्यात आले. प्रत्येक ठिकाणी हाच अनुभव आला.
चांगले गुण असूनही केवळ कौशल्य नसल्याने इंटर्नशिपसाठी संधी मिळत नसल्याचे वास्तव तिने मांडले आहे. कंपन्या केवळ चांगले गुण असलेल्या लोकांना शोधत नाही, तर कौशल्य असलेली लोकं त्यांना हवी आहेत, असे ती म्हणते.
आपल्याला आलेल्या या अनुभवानंतर बिस्माने विद्यार्थ्यांनाही सद्याची स्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ पुस्तकात घुसून राहण्यापेक्षा कौशल्यही विकसित करा, असा सल्ला तिने दिला आहे.
मी तुम्हाला पुस्तके बाजूला ठेवायला सांगत नाही. शिक्षण आवश्यकच आहे. ते घ्याच. पण काही कौशल्यही विकसित करण्याकडे लक्ष द्या. कॉलेजच्या बाहेरील जीवन चांगल्याप्रकारे जगताना तुम्हाला मदत होईल, असे बिस्मा म्हणते.
बिस्मा यांनी आपल्याकडे 50 प्रमाणपत्र, 10 मेडल असूनही इंटर्नशिपसाठी कसलीही मदत होत नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
बिस्मा हिची ही पोस्ट सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेकांनी हे वास्तव मान्य करत कौशल्य किती आवश्यक आहे, याचे महत्व सांगितले आहे.