Jagdish Patil
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे दिवाळी साजरी केली.
शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी बालपांडे कुटुंब आणि महिलांनी औक्षण करून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी गावात आयोजित भजनाच्या कार्यक्रमात गावकऱ्यांसोबत सहभाग घेतला.
मुख्यमंत्र्यांनी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी गावरान भरीत-भाकरीचे जेवण करून तिथेच रात्रीचा मुक्काम केला.
दुष्काळ, चारा, पाणी आणि पिकांच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांशी मोकळेपणाने चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
संकटकाळात शेतकरी एकटा नसून सरकार त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
शेतकरी पुरुषोत्तम वघाळे यांनी मांडलेल्या खोरी प्रकल्पाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी मान्यता देऊन लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
एका शेतकऱ्याने ४३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाझर तलावाचा प्रश्न मांडल्यानंतर त्यावर त्वरित कारवाईचे निर्देश दिले.
दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष' तालुका स्तरावरही सुरू करण्याची घोषणा केली.
या दौऱ्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व इतर मान्यवर उपस्थित होते.