Rashmi Mane
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यासाठी महत्त्वाचे असे चार मोठे निर्णय घेण्यात आले.
महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाशी संबंधित विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. या निर्णयांचा थेट फायदा मुंबई, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना होणार आहे.
बैठकीत महसूल आणि नोंदणी विभागाशी संबंधित प्रक्रिया अधिक सोपी व पारदर्शक करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे नागरिकांना व्यवहार करताना होणारा विलंब टळणार असून भ्रष्टाचारालाही आळा बसणार आहे.
मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)
कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमीटेड संस्थेस कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र.६९७/३/६ मधील २ हे. ५० आर जमीन देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मौजे वेंगुर्ला - कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मान्यता देण्यात आली. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर २९ दिवस तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास मान्यता देण्यात आली. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)