Deepak Kulkarni
राज्यासह दिल्लीच्या राजकारणातही तितकाच दबदबा, महायुतीचे शिल्पकार आणि महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असतो.
राज्यभर फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. याचवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही फडणवीस यांच्यासोबतच्या राजकीय पदार्पणाची आठवण सांगितली आहे.
22 व्या वर्षी नगरसेवक, 27 व्या वर्षी महापौर आणि त्यानंतर आमदार, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, काही काळ उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री अशी दैदिप्यमान कारकीर्द फडणवीसांची राहिली आहे.
नितीन गडकरी यांनी फडणवीसांच्या कारकिर्दीचं कार्यकर्तेपणच मुख्य वैशिष्ट्य म्हटलं आहे.
एकदा भाजपची पक्षांतर्गत चर्चा सुरू असताना आम्ही काही प्रमुख लोकांनी देवेंद्रजींना नगरसेवक म्हणून निवडणूक लढवायला सांगण्याचा निर्णय घेतला होता असंही गडकरींनी सांगितलं.
गडकरी म्हणाले, त्या वेळी ते 22-23 वर्षांचे होते. हा तरुण अत्यंत धडपडा आहे आणि त्यांच्या राजकारण-समाजकारणाला आता पाठबळ व दिशा मिळाली तर त्यातून मोठे नेतृत्व आकाराला येऊ शकते, हा आमचा विश्वास होता.
आज त्या विश्वासाचे फळ आपण पाहतो आहोत आणि आम्हा सर्वांना त्या निर्णयाचा सार्थ आनंद असल्याचंही गडकरींनी म्हटलं.
राजकारण हे केवळ पदांसाठी नसते, तर ते समाजाच्या कल्याणासाठी असते, ही विचारधारा ज्यांच्या अंगी पूर्णपणे बिंबलेली आहे, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे देवेंद्र फडणवीस असल्याचे कौतुकोद्गारही गडकरींनी काढले आहेत.