Rajanand More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि बांग्लादेशमधील हितसंबंध सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मागील अनेक वर्षांनंतर एका राजकीय नेत्याची नियुक्ती उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मोदी सरकारने दिनेश त्रिवेदी यांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकली आहे. त्रिवेदी यांचे पश्चिम बंगालशी जुने नाते असून राज्यात निवडणुकीचे घमासन सुरू असतानाच ही नियुक्ती झाल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.
मागील काही महिन्यांत बांग्लादेश आणि भारतातील संबंध ताणले गेले आहेत. बंगालमधील घुसखोरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापार्श्वभूमीवर एका राजकीय नेत्याची निवड महत्वाची मानली जात आहे.
दिनेश त्रिवेदी हे पश्चिम बंगालमधील बराकपोर मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. त्यांनी केंद्रात यूपीए सरकारच्या काळात मंत्रिपदही भूषविले होते. त्यावेळी ते तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते.
त्रिवेदी हे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात सुरूवातीला आरोग्य व कुटुंब कल्याण आणि नंतर रेल्वे मंत्रिपद होते.
त्रिवेदी यांनी २०१२ मध्ये रेल्वेचे बजेट सादर केल्यानंतर दरवाढीवरून प्रचंड वाद निर्माण झाला. त्यानंतर पक्षप्रमुख व बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानुसार मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
त्रिवेदी हे टीएमसीच्या तिकीटावर २००९ आणि २०१४ असे दोनवेळा लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. तर १९९०, २००२ आणि २०२० मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली होती.
२०२१ मध्ये त्रिवेदी यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत टीएमसीला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
NEXT : राज्यसेवा परीक्षेत टॉपर, आता लाच घेताना अटक; कोण आहेत ‘या’ महिला अधिकारी?