Rashmi Mane
कारगिल विजय दिनास आज 26 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त जिल्ह्यातील हुतात्म्यांची ही वीरगाथा...
या युद्धात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या आठवणींना उजाळा देत सातारा जिल्ह्यातील पराक्रमी सैनिकांच्या कामगिरीचा अभिमान आजही ताजा आहे.
शौर्य, साहस, स्फूर्ती आणि अश्रूंची साक्ष देणारे हे युद्ध भारतीय इतिहासातील एक अभूतपूर्व अध्याय आहे.
1999 मधील कारगिल युद्धात भारतीय लष्कराने कठीण परिस्थितीत विजय मिळवला. या मोहिमेत सातारा जिल्ह्यातील अनेक जवानांनी निधड्या छातीने लढत बलिदान दिले.
अंतवडीचे हुतात्मा महादेव निकम, अवघ्या 22 व्या वर्षी शौर्यपदकाने गौरवले गेलेले चंद्रकांत भोईटे, तसेच संघर्षाच्या मातीतील हुतात्मा कृष्णात घाडगे, हुतात्मा शशिकांत शिवथरे यांनी दाखवलेले शौर्य आजही प्रेरणादायी ठरते.
या युद्धात साताऱ्याच्या सहा वीरांनी प्राणांची आहुती दिली, तर अनेकांनी पराक्रमाने जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. सध्या सातारा जिल्ह्यात सुमारे 40 हजार माजी सैनिक आहेत.
28 ते 30 हजारांहून अधिक जवान विविध ठिकाणी देशसेवेत कार्यरत आहेत. आजवर विविध मोहिमांमध्ये जिल्ह्यातील 230 हून अधिक जवानांनी शौर्य दाखवले आहे. दोन अधिकाऱ्यांना शौर्यपदकाने गौरवण्यात आले आहे.