Vijaykumar Dudhale
उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख नियुक्त केल्यानंतर नाराज असलेल्या राज ठाकरे यांची पुढे शिवसेनेत घुसमट होऊ लागली आणि त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.
अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली. त्यांचे काका शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पक्षावर आता अजित पवारांचे वर्चस्व आहे. सध्या बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा संघर्ष पहायला मिळत आहे.
पंकजा मुंडे यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर धनंजय मुंडे यांची कोंडी होऊ लागली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंकजा यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी परळीतून दोन निवडणुका लढवल्या. त्यात दोघांना प्रत्येकी एकदा यश मिळाले.
अभयसिंहराजे भोसले-उदयनराजे भोसले
उदयनराजे भोसले यांनी 1991च्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत अभयसिंहराजे भोसले यांच्याविरोधात आपले पॅनेल उभे केले होते. स्वतः दोन वॉर्डातून उभे राहिलेल उदयनराजे यांचा एका वार्डातून पराभव झाला होता. तत्पूर्वी कल्पनाराजे भोसले यांनी अभयसिंहराजे भोसले यांच्या विरोधात 1989 मध्ये निवडणूक लढवली होती.
बीडमधील क्षीरसागर कुटुंबीय महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख घराणे मानले जाते. या कुटुंबाचे प्रमुख माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपरिषद निवडणुकीत आपले पॅनेल उतरवून त्यांना आव्हान दिले होते, त्यानंतर मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संदीप यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला
अवधूत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे राजकीय वारसदार मानले जात होते. मात्र, आदिती तटकरे यांच्या राजकीय प्रवेशानंतर काका पुतण्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. अवधूत तटकरे यांनी काकाला सोडून प्रथम शिवसेनेत आणि त्यानंतर भाजपत प्रवेश केला.
काँग्रेस नेते रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष देशमुख आणि त्यांचे काका अनिल देशमुख यांच्यातील वाद सर्व महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे आशिष देशमुख यांनी आपले काका अनिल देशमुख यांच्या विरोधात 2014 मध्ये निवडणूक लढवली होती, त्या निवडणुकीत त्यांनी अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. त्याचा वचपा अनिल देशमुख यांनी 2019 मध्ये काढला.
सोलापूरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते महेश कोठे यांचे पुतणे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे जाऊन भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणातील काका पुतण्यातील पुण्यातील वादाचे लोण आता सोलापूरपर्यंत येऊन पोचले आहे.