Ganesh Sonawane
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे या तरुणीच्या हुंडाबळी प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. या घटनेनंतर समाजात पुन्हा एकदा हुंडा आणि हुंडाबळी या संज्ञा केंद्रस्थानी आल्या आहेत. वैष्णवीच्या निधनानंतर अनेकांकडून या प्रथेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा पार्श्वभूमीवर ‘हुंडा’ हा शब्द नेमका कुठून आला? त्याचा खरा अर्थ काय आहे? याचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
‘हुंडा’ हा शब्द लॅटिन भाषेतील डोटारे या मूळ शब्दावरून विकसित झाला असून, त्याचा अर्थ "दान करणे" किंवा "वाटून देणे" असा होतो. विविध भाषांमध्ये या संकल्पनेचे वेगवेगळे शब्द प्रचलित आहेत — संस्कृतमध्ये याला दहेज, उर्दूमध्ये जाहेज, इंग्रजीत Dowry असे म्हटले जाते. पारंपरिक अर्थाने, विवाहाच्या वेळी वधूच्या घरच्यांनी वराच्या कुटुंबाला दिलेली संपत्ती, वस्तू किंवा आर्थिक मदत यालाच ‘हुंडा’ असे संबोधले जाते.
भारतामध्ये हुंडा या संकल्पनेचा उगम मध्ययुगीन काळात झालेला मानला जातो. त्या काळात विवाहानंतर वधूला आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी तिच्या कुटुंबाकडून रोख रक्कम, दागदागिने किंवा अन्य वस्तू भेट स्वरूपात दिल्या जात असत. ही परंपरा केवळ भारतातच नव्हे, तर युरोप, आफ्रिका आणि जगातील इतर अनेक भागांत वेगवेगळ्या स्वरूपात आढळून येते. नंतर ब्रिटिश काळात या पद्धतीला विरोध होऊन काही प्रमाणात ती रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हुंडा आणि स्त्रीधन या दोन वेगळ्या संकल्पनांमध्ये अनेक वेळा गैरसमज होतो. अनेकांना हे दोन्ही एकसारखेच असल्याचे वाटते, पण प्रत्यक्षात त्यांच्यात मूलभूत फरक असतो. स्त्रीधन म्हणजे विवाहानंतर महिलेच्या नावावर असलेली संपत्ती किंवा भेटवस्तू, ज्यावर तिचा एकमेव आणि पूर्ण हक्क असतो. पती किंवा त्याचे कुटुंब या संपत्तीवर ताबा मिळवू शकत नाही. याउलट, हुंडा ही वधूकडून वराकडे लग्नाच्या वेळी देण्यात येणारी रक्कम, मालमत्ता किंवा वस्तू असते. भारतात 1961 साली लागू झालेल्या ‘हुंडा प्रतिबंधक कायदा’नुसार हुंडा देणे किंवा घेणे हा कायद्याने शिक्षेस पात्र गुन्हा आहे.
हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार, कलम ३ अंतर्गत जर कोणालाही हुंडा घेताना दोषी ठरवले गेले, तर त्याला कमीत कमी पाच वर्षांची सक्त मजुरी आणि ₹15,000 पर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. हुंडा मागणे देखील गुन्हा मानला जातो आणि त्यासाठी सहा महिनेपर्यंत कैद तसेच ₹10,000 पर्यंत दंड होऊ शकतो.
याशिवाय, जर कोणत्याही वधूचा मृत्यू तिच्या लग्नानंतर सात वर्षांच्या आत संशयास्पद किंवा असामान्य परिस्थितीत झाला, आणि त्याआधी तिला हुंड्यासाठी छळ केल्याचे सिद्ध झाले, तर भारतीय दंड संहितेच्या कलम 304-बीनुसार तिच्या पतीसह संबंधित नातेवाईकांवर गुन्हा दाखल होतो. अशा प्रकरणात त्यांना किमान सात वर्षांपासून ते आजीवन कारावासापर्यंतची शिक्षा सुनावली जाऊ शकते.
महाराष्ट्रात हुंडा विरोधात कायदेशीर तरतुदी असतानाही प्रत्यक्षात ही प्रथा आजही सर्रासपणे सुरू आहे. राज्यात अनेक महिलांना आजही हुंड्याच्या लोभामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. राष्ट्रीय स्तरावर पाहिल्यास, दर तासाला एका महिलेला हुंडा संबंधित कारणांमुळे मृत्यूला सामोरे जावे लागते, ही स्थिती अत्यंत गंभीर आहे.