Ganesh Sonawane
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ६५ वर्षांच्या आयुष्यात उत्तर महाराष्ट्रातील 'धुळे' या शहरात दोन वेळा आले होते.
पहिल्यांदा डॉ. आंबेडकर २९ ते ३१ जुलै १९३७ ला धुळ्यात आले होते. त्यानंतर १७ जून १९३८ ला धुळ्यात आले होते.
पहिल्यावेळी बाबासाहेब न्यायालयीन कामकाजासाठी आले होते. धुळे जिल्हा न्यायालयातील तत्कालीन वकील प्रेमसिंह तंवर आणि सी. एम. मुळे यांनी एका दाव्याच्या युक्तीवादासाठी आंबेडकरांना धुळ्यास येण्याचे निमंत्रण दिले होते त्यासाठी ते आले होते.
बाबासाहेब धुळ्यात येणार असल्याची बातमी सर्वदूर पोहचल्याने खानदेशातल्या गावागावातून पहाटे चारपासून शेकडो नागरिकांचे जत्थे धुळ्यातील रेल्वेस्थानकाजवळ जमा होऊ लागले होते.
धुळ्यात त्यावेळी बाबासाहेबांचा दोन दिवसांचा मुक्काम होता. लळींग कुरणातील लांडोर बंगल्यात बाबासाहेब मुक्कामी होते. धुळे शहरातील विजयांनद चित्रमंदिर म्हणजे आजचे स्वस्तिक चित्रमंदिर मध्ये झालेल्या कार्यक्रमातून बाबासाहेबांनी दलित जनतेला मार्गदर्शन केले.
बाबासाहेब ज्या लांडोर बंगल्यावर थांबले होते, त्या घटनेला उजाळा देण्यासाठी दरवर्षी 31 जुलैस त्यांचे हजारो अनुयायी लांडोर बंगल्यावर एकत्र येतात.
त्यानंतर १७ जून १९३८ ला बाबासाहेब धुळ्यात आले होते. १९ जूनपर्यंत ते धुळ्यात थांबले होते असे सांगितले जाते. त्यातील १८ जूनला त्यांनी येथील राजवाडे संशोधन मंडळाला दिलेल्या भेटीची नोंदही आढळून येते.
३१ जुलै १९३७ ला राजेंद्र छात्रालय व १८ जून १९३८ ला राजवाडे संशोधन मंडळाला दिलेल्या भेटीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट पुस्तिकेत लिहलेले संदेश आजही पाहता येतात.