सरकारनामा ब्यूरो
उत्तर प्रदेश पोलिस दलातील उपअधिक्षक अनुज चौधरी हे नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात.
होळीच्या वेळी त्यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या विधानाने चर्चेला तोंड फुटले आहे.
शांतता समितीच्या बैठकीत अनुज चौधरी यांनी एक विधान केले आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिसांनी संभल हिंसाचार प्रकरणात जिल्ह्यातील जामा मशिदीचे प्रमुख अॅडव्होकेट जफर अली यांना अटक केली होती. यावरून संभलमध्ये तणाव निर्माण झाला होता.
याविरोधात शांतता समितीच्या बैठकीत संभलचे डीएसपी अनुज चौधरी म्हणाले की, संभल हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत झालेल्या सर्व अटकेविरुद्ध भक्कम पुरावे सापडले आहेत. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.
"जर माझे विधान इतके चुकीचे होते, तर त्याला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान का देण्यात आले नाही? त्यांनी मला शिक्षा करायला हवी होती," असेही ते म्हणाले.
पोलिस-प्रशासनाचा हेतू फक्त कायदा, सुव्यवस्था आणि शांतता राखणे हा आहे. आम्ही कोणत्याही विशिष्ट समुदायाविरुद्धात कारवाई करण्यासाठी आलेलो नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ते मुस्लिम समाजाला उद्देशून म्हणाले की, 'जर तुम्ही ईदच्या शेवया खाणार आहात, तर गुजिया खाण्याची तयारी ठेवावी लागेल.' याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.