Roshan More
कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठ्ठलाची सहकुटुंब शासकीय महापूजा केली.
यावेळी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उचेगाव मधून आलेले सुधाकर शिंदे आणि प्रणिता शिंदे या मानाच्या वारकऱ्यांसह ही पूजा करण्याचा बहुमान शिंदेंना मिळाला.
यंदा भीषण दुष्काळ आहे. या संकटाची व्याप्ती पाहता ते दूर होऊन बळीराजाला दिलासा मिळो एवढेच मागणे पांडुरंगाच्या चरणी मागितल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
पुजेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सुन वृषाली श्रीकांत शिंदे, नातू रुद्रांश शिंदे उपस्थित होते.
शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मंदिराच्या सभा मंडपात संतपूजन सोहळा आणि धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे मुखपत्र असलेल्या आनंदपंढरी या पुस्तकाचा प्रकाशन एकनाथ शिंदेंच्या हस्ते झाले.
पंढरपुरात दर्शन मंडप, स्काय वॉक आणि टोकन पद्धतीची दर्शन रांग व्यवस्था उभारण्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर हे काम पूर्ण करण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त २५ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा शिंदे यांनी केली.