Rajanand More
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्या पद्मजा वेणुगोपाल यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्या मुळच्या काँग्रेसच्या नेत्या असून लवकरच घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे.
पद्मजा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवी दिल्लीत झालेल्या प्रवेश सोहळ्याला केरळ भाजपचे तत्कालीन प्रभारी प्रकाश जावडेकर उपस्थित होते.
केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांच्या त्या कन्या आहेत. करणाकरन हे १९७७, १९८१–१९८२, १९८२–१९८७ आणि १९९१–१९९५ असे चारवेळा मुख्यमंत्री होते. ते काँग्रेसचे दिग्गज नेते होते.
केरळचे आरोग्यमंत्री के. मुरलीधरन हे पद्मजा वेणुगोपाल यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. मुरलीधरन हे माजी खासदारही होते. तसेच केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
पद्मजा यांनी काँग्रेसच्या तिकीटावर तीनवेळा विधानसभा निवडणूक लढविली होती. पण प्रत्येकवेळी त्यांच्या पदरी निराशा पडली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर यावर्षीही त्यांनी निवडणूक लढविली. पण पुन्हा पराभव.
भाजपमध्ये प्रवेश करणे ही आपली वैयक्तिक चूक होती, असे विधान पद्मजा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देताना केले आहे. पक्षाकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून मदत झाली नाही. पक्षांतर्गत फारसे महत्व दिले जात नसल्याची नाराजीही पद्मजा यांनी व्यक्त केली.
पद्मजा वेणुगोपाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत संकेत दिले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारचे कौतुक केले आहे. त्यामुळे त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे.