Jagdish Patil
मतदान केंद्रांवरील रांगा कमी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आता प्रत्येक केंद्रावर 1200 मतदारांच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिलेत.
याआधी मतदान केंद्रावर 1500 मतदार असायचे. मात्र, नव्या निर्णयामुळे मतदानाचा टक्का वाढेल असा आयोगाला विश्वास आहे.
या निर्णयामुळे मतदान केंद्रांची संख्या 25 टक्क्यांनी वाढेल. तसंच निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांसह EVM, कंट्रोल युनिट आणि 'व्हीव्हीपॅट'ची संख्याही वाढेल.
मतदारांना त्याच्या 2 किलोमीटरच्या परिघातच मतदान केंद्र उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नुकत्याच झालेल्या सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीत हे निर्देश दिलेत.
मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांनी विविध उपाय सुचवले तर यामुळे मतदानाचा टक्का वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महत्त्वाचं म्हणजे याआधी प्रत्येक केंद्रावर 1500 लोक मतदान करायचे आणि ही संख्या जास्त झाल्यास त्याच ठिकाणी साहाय्यकारी मतदान केंद्र उभारायचे.
मात्र, आता मतदान केंद्रांवरील रांगा कमी करण्यासाठी एका केंद्रावर 1500 मतदारांची संख्या 1200 करण्यात आली आहे.
त्यामुळे शहरी भागात मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात लागणाऱ्या रांगा कमी होतील, असा आयोगाला विश्वास आहे.