Rashmi Mane
तुमच्या घरातील टीव्ही, कॉम्प्युटर किंवा चार्जर बंद असतानाही वीजबिल वाढतय असं कधी तुमच्या सोबत झालं आहे का? अनेकांना वाटतं की उपकरण बंद केलं म्हणजे त्याचा विजेचा वापर पूर्णपणे थांबतो.
प्रत्यक्षात अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद अवस्थेतही थोड्याफार प्रमाणात वीज वापरत राहतात. यालाच ‘स्टँडबाय पॉवर कंझम्प्शन’ म्हटलं जातं.
याच अनावश्यक वीजवापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात ‘1-Watt Rule’ लागू करण्यात आला होता. हा नियम ग्राहकांचे पैसे वाचवण्यासोबतच ऊर्जा बचतीसाठीही महत्त्वाचा ठरला आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज जवळपास प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही, होम थिएटर, गेमिंग कन्सोल, मायक्रोवेव्ह, कॉम्प्युटर आणि विविध स्मार्ट उपकरणे वापरली जातात.
ही उपकरणे वापरात नसतानाही काही अंतर्गत सुविधा कार्यरत ठेवतात. त्यामुळे ती पूर्णपणे बंद दिसत असली तरी वीजेचा वापर सुरूच असतो.
वीजेची होणारी ही नासाडी कमी करण्यासाठी 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाची मोहीम सुरू करण्यात आली. नंतर हीच मोहीम ‘One-Watt Initiative’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
या उपक्रमाचे उद्दिष्ट असे होते की 2010 पर्यंत घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी स्टँडबाय मोडमध्ये जास्तीत जास्त 1 वॉट वीजच वापरावी. पुढे नियम अधिक कठोर करण्यात आला आणि अनेक उपकरणांसाठी ही मर्यादा 0.5 वॉटपर्यंत आणण्यात आली.
या नियमाचा सर्वात मोठा फायदा ग्राहकांना झाला. उत्पादक कंपन्यांना कमी वीज वापरणारी उपकरणे विकसित करावी लागली. परिणामी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत खूपच ऊर्जा कार्यक्षम बनली आहेत. त्यामुळे वीजबिलातही बचत होऊ लागली आहे.