Rajanand More
इलॉन मस्क हे अमेरिकन उद्योगपती आहेत. त्यांची स्टारलिंक ही एक कंपनी असून त्यामार्फत सॅटेलाईटच्या माध्यमातून हायस्पीट इंटरनेट सेवा म्हणजे सॅटकॉम जगभरातील अनेक देशांमध्ये पुरवली जाते.
मस्क यांच्या सॅटकॉमला भारतातही मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारने या सेवेला हिरवा कंदील दाखविला आहे. काही महिन्यांपासून याबाबतचे संकेत मिळत होते.
स्टारलिंक ही असा परवाना मिळालेली देशातील तिसरी कंपनी ठरली आहे. यापूर्वी रिलायन्स जिओ आणि यूटेलसॅटच्या वनवेबला परवाना मिळालेला आहे.
सॅटकॉमसाठी कसल्याही केबल किंवा टॉवरची गरज भासत नाही. ही सेवा थेट सॅटेलाईट म्हणजे उपग्रहामार्फत पुरविली जाणार असल्याने भारताच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध होऊ शकते.
डोंगराळ भागात स्टारलिंकच्या सेवेमुळे हायस्पीड इंटरनेट पोहचविणे शक्य होणार आहे. सध्याची इंटरनेट सुविधा या भागात पोहचविण्यात अनेक अडथळे येतात.
स्टारलिंकचे हजारो सॅटेलाईट पृथ्वीवर ५०० ते २ हजार किलोमीटर अंतरावरून फिरतात. ग्राहकाच्या घरात किंवा कार्यालयात एक छोटा डिश अटेंना किंवा राऊटर बसविला जातो. त्यामार्फत इंटरनेट सुविधा मिळते.
स्टारलिंकच्या सेवेमुळे इंटरनेट मोफत मिळणार नाही. ही एक व्यावसायिक सेवा आहे. इतर इंटरनेट पुरवठादारांप्रमाणेच ही सेवाही सशुल्क आहे.
आतापर्यंत भारतासाठी कोणतेही अधिकृत रेटकार्ड जारी करण्यात आलेले नाही. पण अमेरिका व यूरोपमध्ये याचा मासिक खर्च ८ ते १० हजार एवढा आहे. भारतात हे दर काहीप्रमाणात कमी असण्याची शक्यता आहे.