Vijaykumar Dudhale
महादेव जानकर यांचा जन्म 19 एप्रिल 1968 रोजी सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील पळसावडे येथे झाला.
जानकर यांचे शिक्षण सांगली येथील वालचंद महाविद्यालयात झाले असून ते अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत. त्यांना अभियांत्रिकीमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे.
कांशीराम यांच्या विचारांचा महादेव जानकर यांचा प्रभाव होता. कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्षापासून प्रेरणा घेऊनच त्यांनी २००३ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. जानकर हे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
राष्ट्रीय समाज पक्ष हा प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, आसाम, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गोवा या राज्यांत निवडणुका लढवतो.
माढा मतदारसंघातून महादेव जानकर यांनी 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती.
बारामती लोकसभा मतदारसंघातून 2014 मध्ये जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना जोरदार लढत दिली होती. त्यावेळी जानकर यांना साडेचार लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती.
राज्यात 2014 मध्ये जानकर यांनी भाजपसोबत युती केली होती. त्यानंतर 2015 मध्ये त्यांना भाजपकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पुढे जुलै 2016 मध्ये कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्याकडे पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्रालय देण्यात आले होते.
महादेव जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक परभणीतून लढण्याचे जाहीर केले आहे, त्याचबरोबर त्यांचा बारामती लोकसभा मतदारसंघावरही दावा आहे. मात्र, भाजप त्यांना लोकसभेला जागा सोडणार का, हा खरा प्रश्न आहे.