Rajanand More
आयपीएस मुरलीधर शर्मा यांची सध्या देशभर चर्चा होत आहे. मोठ्या पदावर, अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर असतानाही त्यांनी एक आयटम साँग लिहित सर्वांनाच धक्का दिला आहे.
शर्मा यांची ओळख आधीपासूनच शायर म्हणून आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये ते गझल सादर करत असतात. त्यांना चांगला प्रतिसादही मिळतो.
मागील 30 वर्षांपासून गझल लिहिण्याचा आपला छंद जोपासलेल्या या आयपीएस अधिकाऱ्याने एका बंगाली चित्रपटासाठी पहिल्यांदाच गाणं लिहित चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले आहे.
बंगाली चित्रपट ‘मृगया’साठी त्यांनी ‘शोर मचा’ हे आयटम साँग लिहिलं आहे. गायिका सुनिधी चौहान यांनी हे गीत गायलं आहे. आताच हे गाणं प्रसिध्दीच्या झोतात आले आहे.
चित्रपटासाठी आयटम साँग लिहिण्याची तयारी शर्मा यांनी स्वत:हून व्यक्त केली होती. त्यांनी पहिल्यांदाच गाणं लिहिल्यानंतरही त्यात काहीही बदल न करता चित्रपटात घेण्यात आले.
शर्मा हे पश्चिम बंगाल पोलिस दलात सध्या महानिरीक्षक पदावर आहेत. एवढ्या मोठ्या पदावर असूनही त्यांनी आपला लेखनाचा छंद जोपासला आहे.
अत्यंत कडक आणि शिस्तीचे अधिकारी म्हणून शर्मा यांची पोलिस दलात ओळख आहे. आता त्यांची दुसरी बाजूही समोर आली आहे.
शर्मा हे संवेदनशील लेखक आहेत. आयुष्यातील अनुभव, निरीक्षणं आणि आपले विचार ते शब्दांमध्ये गुंफत असतात. आयटम साँगमध्येही त्यांनी एक संदेश दिला आहे.