Roshan More
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या निवृत्त होणाऱ्या सभासदांसाठी ईपीएफचे पैसे हप्त्यांमध्ये काढण्याच्या योजनेला (सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन) केंद्रीय विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली.
या नव्या योजनेमुळे सभासदांना आपला जमा झालेला भविष्य निर्वाह निधीचा पैसा एकरकमी काढून घेण्याऐवजी ठरावीक कालावधीत हप्त्या-हप्त्याने काढता येईल.
एकाचवेळी मोठी रक्कम हातात आल्यावर तिचे व्यवस्थित नियोजन करणे अनेकांना कठीण जाते.
अशा सभासदांना निवृत्तीनंतर नियमित आणि भरवशाचा पैसा मिळत राहावा आणि कुटुंबाचे हित जपले जावे यासाठी ही योजना आणली आहे.
योजना ऐच्छिक सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे काढण्याची योजना ऐच्छिक असेल.
पहिल्या टप्प्यात सध्याच्या ईपीएफओ सभासदांवर लक्ष केंद्रित केले जाईल. सुरुवातीला ५५ वर्षांवरील सुमारे ६.३ लाख सभासदांना याचा फायदा होऊ शकतो, असा ‘ईपीएफओ’चा अंदाज आहे.
निवृत्तीनंतर लवचीक, नियमित आणि भरवशाचा पैसा मिळत राहावा, कुटुंबाचे हित जपले जावे आणि वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षितता अधिक भक्कम व्हावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे ईपीएफओने स्पष्ट केले आहे.