Rashmi Mane
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) दिवाळीपूर्वी देशातील 7 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.
या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता ते आपल्या भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यातून 100% रक्कम काढू शकणार आहेत.
यासोबतच इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे.
EPFO ने कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे भविष्य निर्वाह निधी काढण्याच्या नियमांमध्ये बदल. यापूर्वी पीएफ खात्यातून संपूर्ण रक्कम काढण्यावर अनेक निर्बंध होते.
केवळ विशिष्ट परिस्थितीतच आणि अनेक अटींची पूर्तता केल्यानंतरच अंशतः रक्कम काढता येत होती. मात्र, आता नवीन नियमांनुसार, कर्मचारी आपल्या गरजेनुसार पीएफ खात्यात जमा असलेली संपूर्ण रक्कम काढू शकणार आहेत. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
या निर्णयाचा थेट फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे. EPFO ने पीएफ काढण्याचे 13 किचकट नियम सोपे केले आहेत.
आता कर्मचाऱ्यांना घराचे बांधकाम, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा वैद्यकीय आणीबाणी अशा कारणांसाठी सहजपणे आणि कमी कागदपत्रांमध्ये पीएफची रक्कम काढता येईल. या प्रक्रियेला गती मिळावी यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ईपीएफओने सर्व प्रकारच्या आंशिक निकासीसाठी लागणारी किमान सेवा मुदत 12 महिने इतकी कमी केली आहे. या बदलामुळे कमी काळ कर्मचाऱ्यांनाही निधी मिळवणं सोपं होईल.