Rashmi Mane
जर तुम्ही सध्या नोकरी करत असाल आणि तुमचे पैसे EPF मध्ये जमा होत असतील, तर तुमच्यासाठी ही बातमी नक्कीच दिलासादायक आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपली संपूर्ण यंत्रणा अधिक आधुनिक, डिजिटल आणि वापरकर्त्यांसाठी सोपी केली आहे.
EPFO 3.0 अंतर्गत करण्यात आलेल्या बदलांमुळे पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा खूपच जलद आणि सुलभ झाली आहे.
केंद्र सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन ईपीएफ दाव्यांवर प्रक्रिया करण्यासाठी आता सरासरी केवळ आठ दिवस लागतात. म्हणजेच, तुमची वैयक्तिक माहिती अचूक असेल आणि केवायसी पूर्ण असेल, तर साधारण एका आठवड्यातच रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
पूर्वी पीएफ काढण्यासाठी अनेक अडचणी येयच्या. फायल अडकणे, नियोक्त्याची मंजुरी मिळण्यास विलंब होणे किंवा प्रोफाइलमधील चुका यामुळे अनेकदा आठवडे किंवा महिने जात असत.
मात्र EPFO 3.0 मुळे ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात जानेवारी 2026 पर्यंत 85 दशलक्षांहून अधिक दाव्यांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. यावरून प्रणाली अधिक वेगवान आणि कार्यक्षम झाल्याचे स्पष्ट होते.
ई-केवायसी पूर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी सुविधा देण्यात आली आहे. आता पीएफ हस्तांतरणासाठी नियोक्त्याच्या मंजुरीची आवश्यकता नाही.
कर्मचारी स्वतःच ऑनलाइन पद्धतीने पीएफ ट्रान्सफरचा दावा करू शकतात. वारंवार नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा जुन्या कंपनीशी संपर्क न होणाऱ्यांसाठी ही सुविधा खूपच उपयुक्त ठरणार आहे.