Rajanand More
माजी IPS अधिकारी काम्या मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. बिहार केडरमधील धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख मिळविणाऱ्या काम्या मिश्रा आता वेगळ्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
काम्या मिश्रा यांनी नुकतीच जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काम्या यांच्या या फोटोमुळे त्यांची राजकारणात एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी नेटकऱ्यांनी मात्र काम्या मिश्रा यांना थेट भावी शिक्षणमंत्री म्हटले आहे.
काम्या मिश्रा या मूळच्या ओडिशातील रायरंगपूर येथील रहिवासी आहेत. बिहारमध्ये त्यांनी सहा वर्षांतच लेडी सिंघम म्हणून वेगळी ओळख निर्माण केली होती.
काम्या या २०१८ च्या हिमाचल प्रदेश केडरच्या अधिकारी होत्या. त्यानंतर २०१९ बॅचचे IPS अधिकारी अवधेश दीक्षित यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचे केडर बिहारमध्ये हस्तांतरित करण्यात आले.
बिहारमध्ये काम्या मिश्रा यांनी पाटणा सचिवालयात एएसपी म्हणूनही काम केले. त्यांची दरभंगाच्या पहिल्या ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली. या काळातच त्यांना 'लेडी सिंघम' म्हणूनही ओळख मिळाली.
ऑगस्ट २०२४ मध्ये काम्या मिश्रा यांनी वैयक्तिक कारण देत IPS पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा सुमारे सात महिन्यांनंतर, २७ मार्च २०२५ रोजी मंजूर झाला. त्या हिमाचल प्रदेशातील वडिलांचा व्यवसाय सांभाळणार असल्याची चर्चा आहे.
काम्या मिश्रा आणि अवधेश दीक्षित यांची IPS च्या प्रशिक्षणादरम्यान ओळख झाली. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २०२० मध्ये त्यांनी न्यायालयात विवाह केला, तर २०२१ मध्ये पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला.