सरकारनामा ब्यूरो
महायुती सरकारला महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा निवडून दिले आहे. फडणवीस सरकारने पहिल्या 100 दिवसांचा टप्पा पूर्ण केला असून या सरकारच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे.
पण राज्यातील जनतेच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे फडणवीस सरकारने लक्ष घालणे गरजेचे असल्याचे, सकाळ समूहाकडून 36 जिल्ह्याचा घेतलेल्या कामगिरीच्या आढाव्यावरून लक्षात आले आहे.
कामगिरीचा आढाव घेत असताना जनतेने तीन महत्त्वाच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. याकडे फडणवीस सरकारने जास्तीत लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.
36 जिल्ह्याच्या सर्वेतून शेती या विषयावर सरकारने जास्त लक्ष द्यावे, असे 34 टक्के नागरिकांनी अहवालातून सांगितले. यामध्ये 23 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, सरकारने उद्योग आणि रोजगार वाढीवर भर देणे गरजेचे आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने शेतीला पिक विमा योजना आणि नुकसान भरपाई वेळेच्या वेळी द्यावी असे या अहवालातून समोर आले आहे.
राज्यातील लोकसंख्येचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, त्यातुलनेने रोजगाराच्या संधी मात्र उपलब्ध होत नाहीत. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे.
ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने तरुण शहराकडे स्थलांतर करतो, मात्र तिथे पुरेसे वेतन नसल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्ती केल्या आहेत.
शिक्षणाचा खर्च वाढत अल्याने सर्वसामान्य जनतेला मुलांना चांगले शिक्षण देणे परवडत नसल्याचा मुद्दा नागरिकांनी मांडला आहे. तसेच शाळेतील अत्याधुनिक सुविधा, यंत्रणा आणि सुरक्षा कमी खर्चात व्हाव्यात असे या अहवालातून समोर आले.
मराठी माध्यमांच्या शाळांची स्थिती आणि संख्या कमी होताना दिसत आहे. शिक्षणाच्या दर्जाबाबत समाधानी असणारा बहुतांश वर्ग हा उच्चभ्रू असल्याचे या अहवालातून समोर आले.