Rashmi Mane
महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नाही, तर राजकीय पायाभूत मंच मानला जातो. नगरसेवकापासून खासदारकीपर्यंतचा मार्ग गणेश मंडळातून जातो.
सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक आणि राजकीय व्यासपीठही ठरला आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते लोकांशी थेट संपर्क साधतात, संघटना उभी करतात, त्यामुळे गणपती मंडळ ही अनेक तरुणांसाठी राजकारणाची पहिली पायरी ठरते.
गणपती मंडळात काम करणारा कार्यकर्ता वर्गणी गोळा करताना प्रत्येक घराशी संपर्क साधतो, कार्यक्रमांचे नियोजन करतो आणि अडचणींवर उपाय शोधतो. या प्रक्रियेत आत्मविश्वास, धडाडी आणि जनसंपर्क कौशल्य विकसित होतं
निवडणुकीच्या वेळी अशा कार्यकर्त्यांचा पक्षांना फार उपयोग होतो. मतदारांना केंद्रांची माहिती देणं, प्रचाराची कामं करणं ही मंडळातील कार्यकर्त्यांची खास ताकद ठरते.
महाराष्ट्र भरात आज हजारो सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. त्यातली कित्येक दशकानुदशकं कार्यरत असून त्यांनी स्थानिक पातळीवर मजबूत मुळे रोवली आहेत. त्यामुळेच अनेक नगरसेवक, आमदार, खासदार हे मंडळातूनच राजकारणात पुढे आले.
आज हजारो मंडळं नोंदणीकृत आहेत. अनेक मंडळं पन्नास वर्षांहून जुनी असून त्यांच्या कार्यातून स्थानिक राजकारणाला वेगळं वळण मिळालं आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ज्या पुणे शहरातून झाली तिथून वसंतराव थोरात, सुरेश कलमाडी यांसारख्या नेत्यांनी मंडळांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवून राजकीय यश मिळवलं.
गणेश मंडळाचा फायदा म्हणजे मंडळ एखाद्या नेत्याभोवती केंद्रित राहू शकतं. यामुळे त्याला स्थानिक राजकारणात स्वतंत्र बळकटी मिळते.
पक्ष तिकीट कोणत्याही पक्षाकडून मिळालं तरी अशा नेत्याला विजय मिळवण्याची शक्यता वाढते. म्हणूनच सगळे राजकीय पक्ष गणेश मंडळांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात.
एकंदरीत, गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा उत्सव नसून राजकीय कारकिर्दीचं व्यासपीठ ही आहे. कार्यकर्त्यांना मिळणारे अनुभव, लोकसंपर्क आणि संघटन कौशल्यं यामुळे गणेशोत्सवातून अनेक नेते घडले आहेत.