Rashmi Mane
भारतीय संस्कृतीत गुरूला देवाच्या स्थानावर मान देण्यात आला आहे. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी साजरी होणारी गुरुपौर्णिमा ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून, ती आपल्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारशाचे दर्शन घडवणारी प्रेरणादायी परंपरा आहे.
प्राचीन काळापासून गुरु-शिष्य नातं हे भारतीय समाजाचा आत्मा राहिलं आहे. वैदिक ऋषी, महाकाव्यांतील महान व्यक्तिमत्त्वे आणि तत्त्वज्ञान देणारे गुरू यांचे योगदान आजही लक्षात ठेवले जाते.
वशिष्ठ ऋषी हे अयोध्येचे राजगुरु होते. त्यांनी श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या राजपुत्रांना धर्म, राजधर्म आणि मर्यादा शिकवल्या. वशिष्ठांच्या मार्गदर्शनामुळेच श्रीराम 'मर्यादा पुरुषोत्तम' म्हणून ओळखले गेले.
ज्यांनी वेदांचे वर्गीकरण, महाभारत आणि पुराणांचे लेखन केले, त्यांचे शिष्य वैशंपायन आणि शुक यांनी ज्ञान परंपरेचा विस्तार केला. त्यामुळेच आजही महाभारताचे महत्त्व कायम आहे.
भगवान परशुराम यांनी भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांना धनुर्विद्या शिकवली. द्रोणाचार्यांनी पुढे अर्जुनासह सर्व पांडव-कौरवांना युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. एकलव्य याने गुरु मानलेल्या द्रोणाचार्याचा पुतळा बनवून स्वतःच विद्या संपादन केली ही घटना आजही आदर्श मानली जाते.
भारतीय इतिहासातील महाकाव्य महाभारतामध्ये कौरव आणि पांडव राजपुत्रांचे धनुर्विद्येतील गुरू म्हणून द्रोणाचार्यांचे नाव अत्यंत सन्मानाने घेतले जाते.
सांदीपनी ऋषींच्या आश्रमात श्रीकृष्ण व बलराम यांनी चौसष्ट कला आत्मसात केल्या. उज्जैनजवळ आजही त्यांचा आश्रम आहे.
विश्वामित्र ऋषी हे एकमेव क्षत्रिय राजे होते, ज्यांनी कठोर तपश्चर्येने ब्रह्मर्षी पद प्राप्त केले. त्यांनी श्रीराम आणि लक्ष्मणाला अनेक दिव्य अस्त्रांचे शिक्षण दिले.
आर्य चाणक्य हे केवळ एक गुरू नव्हते, तर ते एक राष्ट्रनायक होते. त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला शिक्षण देऊन नंद घराण्याचा अंत करून मौर्य साम्राज्य उभारले. त्यांनी लिहिलेला ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ हा ग्रंथ आजही राज्यशास्त्राच्या अभ्यासासाठी मार्गदर्शक ठरतो.