Jagdish Patil
राज्यातील शेतकऱ्यांना परदेशात जाऊन शेती पाहण्याची संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
प्रगत देशांतील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी 'शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2025-26' ही योजना राबविण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत युरोप- नेदरलँड, जर्मनी, फ्रांस, स्वित्झर्लंड, इस्राईल, जपान, व्हिएतनाम, मलेशिया फिलिपिन्स, चीन, द. कोरिया अशा देशांमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे.
या अभ्यास दौऱ्यासाठी परदेशात कोण जाऊ शकतं आणि त्यासाठीचे निकष काय आहेत ते जाणून घेऊया.
या अभ्यास दौऱ्याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वत: शेतकरी असावा, त्याच्या नावचा चालू सात-बारा व 8-अ उतारा असणं आवश्यक आहे.
शेतकऱ्यांचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी आयकार्ड असणं आवश्यक आहे. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
सर्वात महत्वाचं शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. यासह वैध मुदतीचा पासपोर्टही गरजेचा आहे.
शासनाकडून या अभ्यास दौऱ्याकरिता एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लाखापर्यंतची रक्कम अनुदान म्हणून दिली जाईल.
जिल्ह्यातील 5 शेतकऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यात एका महिलेचा समावेश असेल. तर या योजनेसाठी 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.