Rajanand More
छत्तीसगड पोलिस दलातील डीएसपी कल्पना वर्मा यांची सध्या देशभरात चर्चा होत आहे. रायपूरमधील उद्योजक दीपक टंडन यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
कल्पना यांनी आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आतापर्यंत अडीच कोटी रुपये, लक्झरी कार, डायमंड रिंग आणि लाखो रुपयांचे दागिने घेतल्याचा आरोप उद्योजकाने केला आहे. आता दोघांमधील व्हॉट्स अप चॅटिंग व्हायरल झाले आहे.
कल्पना वर्मा या २०१६ पासून पोलिस दलात आहेत. सध्या त्यांची नियुक्ती संवेदनशील असलेल्या दंतेवाडा जिल्ह्याती डीएसपी या पदावर आहे.
राज्यात काँग्रेसची सत्ता असताना त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. भाजपचे नेते त्यांच्या कार्यालयात निवेदन देण्यास गेले होते. पण बराच वेळ त्या मोबाईल पाहण्यात व्यस्त होत्या.
दीपक टंडन यांनी खम्मरडीह पोलीस ठाण्यात वर्मा यांची तक्रार दिली आहे. दोघांची ओळख २०२१ मध्ये एका मित्राच्या माध्यमातून झाल्याचा उल्लेख त्यांनी तक्रारीत केला आहे.
ओळख वाढत गेल्यानंतर कल्पना यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत व्हिडीओ कॉलवर बोलणे, सतत फोन करणे असे सुरू झाले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याचे टंडन यांनी म्हटले आहे.
कल्पना यांनी विविध कारणे देत आपल्याकडून पैसे, दागिने एवढेच नाही तर एक हॉटेलही हडपल्याचा गंभीर आरोप उद्योजकाने केला आहे.
कल्पना वर्मा यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप राजकीय षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.