Rajanand More
घरात रोकड सापडल्याच्या प्रकरणात वादात अडकलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधात लोकसभेत महाभियोगची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आली आहे.
वर्मा यांच्यानंतर आता आणखी एका न्यायमूर्तींविरोधात महाभियोग चालविण्याचा प्रस्ताव इंडिया आघाडातील खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे दिला आहे.
मद्रास हायकोर्टातील न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन यांच्याविरोधात महाभियोगची कारवाई सुरू करण्याची मागणी १२० खासदारांनी केली आहे.
विरोधकांच्या प्रस्तावावर अखिलेश यादव, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, डिंपल यादव, टी. आर. बालू, दयानिधी मारन आदी खासदारांच्या सह्या असल्याचे एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे.
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या वागणुकीमुळे त्यांची निष्पक्षता आणि पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित निर्माण होत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.
न्यायमूर्तींचे काही निर्णय राजकीय विचारधारेने प्रभावित आहेत. त्यांचे निर्णय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष मुल्यांच्याविरोधात असल्याचाही आरोप आहे.
काही दिवसांपूर्वी न्यायमूर्तींनी मदुरै येथील थिरूपरनकुंद्रम टेकडीवरील एका दर्ग्याजवळ असलेल्या मंदिरात दिवे पेटविण्याबाबतचा आदेश दिला होता. यावरून वाद निर्माण झाला असून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले आहे.
स्वामीनाथन यांची २८ जून २०१७ ला मद्रास हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ते ८ वर्षांपासून या कोर्टात आहे. मे २०३० मध्ये ते निवृत्त होणार आहेत.