Rashmi Mane
एकेकाळी जिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या अपराजिता सारंगी आज राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा चेहरा बनल्या आहेत. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळण्याची चर्चा रंगली आहे.
अपराजिता सारंगी यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1969 रोजी बिहारमधील मुजफ्फरपूर येथे झाला. शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या कुटुंबात वाढ झाल्याने त्यांच्यात लहानपणापासूनच अभ्यासाची आवड निर्माण झाली.
भागलपूर विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत त्या 1994 बॅचच्या ओडिशा कॅडरच्या IAS अधिकारी बनल्या.
प्रशिक्षणादरम्यान त्यांची ओळख IAS अधिकारी संतोष कुमार सारंगी यांच्याशी झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी कुटुंबाच्या संमतीने विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत.
1996 मध्ये उपजिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. त्यांच्या कामकाजामुळे त्यांची ओळख कर्तव्यदक्ष आणि परिणामकारक अधिकारी म्हणून निर्माण झाली.
1998 ते 2006 या काळात त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम केले. ग्रामीण विकास, प्रशासनातील पारदर्शकता आणि लोकाभिमुख निर्णयांसाठी त्यांची विशेष प्रशंसा झाली.
भुवनेश्वर महानगर आयुक्त म्हणून त्यांनी शहर विकासाच्या अनेक योजना राबवल्या. पुढे पंचायत राज विभागाच्या सचिवपदावर काम करताना त्यांनी सुशासनाची वेगळी छाप निर्माण केली होती.
सध्या त्या भाजपच्या प्रमुख राष्ट्रीय प्रवक्त्या आणि संसदीय समित्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रीपद मिळू शकते, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.