Rashmi Mane
गांधी विचारांचे कृतीशील पुरस्कर्ते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते डॉ. गुणवंतराय गणपतलाल पारीख अर्थात डॉ. जी. जी. पारीख यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचे भाषण थांबून जी. जी. पारीख यांना श्रद्धांजली वाहिली.
ते 100 वर्षांचे होते. त्यांच्या निवासस्थानी, ग्रँट रोड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगी सोनल शाह आणि नातू कबीर शाह असा परिवार आहे. मृत्युपश्चात त्यांनी देहदान केले.
डॉ. पारीख यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर गांधी तत्त्वज्ञानाचा प्रसार-प्रचार केला. श्वासात, ध्यासात आणि कृतीत गांधी विचार जगलेला हा स्वातंत्र्य संग्रामातील तारा गांधी जयंतीच्या दिवशी मावळणे हा एक दुर्मीळ योगायोग ठरला.
30 डिसेंबर 1924 ला सौराष्ट्रातील सुरेंद्रनगर येथे जन्मलेल्या डॉ. पारीख यांनी शालेय शिक्षण जयपूर, कानपूर आणि सुरेंद्रनगर येथे पूर्ण केले. मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून बी.एससी. पदवी घेतल्यानंतर त्यांनी जी.एस. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झाले.
महाविद्यालयीन काळातच त्यांनी विद्यार्थी चळवळीत सहभाग घेतला. 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात त्यांनी ब्रिटिशांविरोधात सक्रिय भूमिका घेतली. यासाठी त्यांना अटक होऊन दहा महिने तुरुंगवास भोगावा लागला.
स्वातंत्र्यानंतरही त्यांनी समाजपरिवर्तनासाठी योगदान सुरू ठेवले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या उन्नतीसाठी त्यांनी 1962 मध्ये पनवेलजवळील तारा येथे युसूफ मेहरली सेंटरची स्थापना केली. अंतिम श्वासापर्यंत ते या केंद्राच्या कामात सक्रिय होते.
1975 च्या आणीबाणीच्या काळात डॉ. पारीख समाजवादी पक्षाच्या मुंबई युनिटचे अध्यक्ष होते. कामगार नेते जॉर्ज फर्नाडीस, विरेन शहा यांच्यासह त्यांना बडोदा डायनामाइट प्रकरणात अटक झाली. त्यांनी तब्बल 20 महिने येरवडा व तिहार तुरुंगात घालवले. त्यांच्या पत्नी मंगला पारीख यांनाही मीसा कायद्याखाली अटक झाली होती.
स्वातंत्र्य चळवळ, समाजवाद, ग्रामीण विकास आणि गांधी तत्त्वज्ञान या चारही क्षेत्रांत मोलाचे योगदान देत डॉ. जी. जी. पारीख यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या निधनाने गांधीवादी विचारांचा निष्ठावंत पुरस्कर्ता हरपल्याची भावना समाजात व्यक्त होत आहे.