Ganesh Sonawane
गजाला हाशमी यांनी व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नर पदावर विजय मिळवून इतिहास रचला आहे. त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या मुस्लिम आणि दक्षिण आशियाई महिला ठरल्या आहेत.
४ नोव्हेंबरच्या निवडणुकीत गजालांनी रिपब्लिकन उमेदवार जॉन रीड यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. निकालानंतर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
गजाला हाशमी यांचा जन्म १९६४ मध्ये भारतातील हैदराबाद येथे झाला. त्यांचे बालपण मलकपेट भागात गेले आणि वयाच्या चौथ्या वर्षी त्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाल्या.
त्यांचे वडील तनवीर हाशमी आणि आई झिया हाशमी दोघेही शिक्षण क्षेत्राशी संबंधित होते. तनवीर हाशमी यांनी अमेरिकेत जॉर्जिया विद्यापीठातून पीएचडी केली.
तनवीर हाशमी यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून एमए आणि एलएलबी पूर्ण केले होते. पुढे त्यांनी अमेरिकेत आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्र स्थापन करून तेथून संचालक म्हणून निवृत्ती घेतली.
गजालांनी जॉर्जिया सदर्न विद्यापीठातून बीए आणि एमोरी विद्यापीठातून अमेरिकन साहित्यात पीएचडी केली. त्यांचे लग्न अझहर रफिक यांच्याशी झाले असून त्यांना दोन मुली आहेत.
२०१९ मध्ये गजालांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळवली आणि पहिल्याच प्रयत्नात रिपब्लिकन उमेदवाराला पराभूत केले. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे त्यांना जनतेत विशेष विश्वास मिळाला.
२०२४ मध्ये त्या व्हर्जिनिया सिनेटच्या शिक्षण आणि आरोग्य समितीच्या अध्यक्ष झाल्या. त्यांच्या विजयाचा आनंद हैदराबादपासून अलीगढपर्यंत साजरा झाला; लोक त्यांना "अमेरिकेत इतिहास रचणारी भारताची कन्या" म्हणत गौरवत आहेत.