Rashmi Mane
मुंबई लोकल ट्रेन प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! पश्चिम रेल्वेच्या मार्गावर तब्बल सात नवीन स्थानके उभारली जाणार आहेत.
मुंबई रेल्वे विकास निगम (MRVC) या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळत असून कामाला वेग देण्यात आला आहे.
येत्या दोन वर्षांत म्हणजेच पश्चिम रेल्वेच्या विरार–डहाणू मार्गावर तब्बल सात नवीन स्थानके उभारली जाणार आहेत. या कामासाठी तब्बल 3,578 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
सध्या विरार–डहाणू या 64 किलोमीटरच्या मार्गावर केवळ 9 स्टेशन आहेत – वैतरणा, सफाले, केलवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर आणि वाणगाव. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे तसेच नवीन ठाण्यांची मागणी लक्षात घेऊन सात नवीन स्टेशन जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या स्थानकांमध्ये वाधीव, सरतोडी, माकूणसर, चिंतुपाडा, पांचाली, वांजरवाडा आणि बीएसईएस कॉलनी यांचा समावेश आहे.
या प्रकल्पातील तब्बल 41 टक्के काम पूर्ण झाले आहे. नव्या स्थानकांच्या ठिकाणी तांत्रिक बांधकामाला सुरुवात झाली आहे. याशिवाय या मार्गाचे चौपदरीकरणही करण्यात येणार असून त्यामुळे गाड्यांची वहनक्षमता वाढणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या पालघर–डहाणू या भागातील प्रवाशांना लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो.
नवीन स्टेशन झाल्यामुळे प्रवास अधिक सोयीचा आणि आरामदायी होईल. वेळेची बचत होईलच, शिवाय गर्दीचे प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी होईल.
मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच नवीन स्थानकांची उभारणी होत आहे.