Jagdish Patil
स्मार्टफोनमुळे लोकांची अनेक कामे सोपी झाली असून ते आता घरबसल्या अनेक कामं क्षणात पूर्ण करू शकतात.
मात्र, स्मार्टफोन वापरणाऱ्यांचा डेटा चोरी करून सायबर गुन्हेगारांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर गुगलने अँड्रॉइड आणि आयफोन वापरणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
हॅकर खोटे मेसेज पाठवून फसवणूक करतात. ज्याला 'स्मिशिंग' म्हटलं जातं. फोर्ब्सच्या अहवालानुसार, असे दररोज लाखो स्पॅम मेसेज पाठवले जातात.
या मेसेजमध्ये, तुमचं पेमेंट फेल झालंय, पार्सल डिलीव्हर झालं नाही, तरी सविस्तर तपशीलांसाठी 'क्लिक करा' किंवा 'रिफंड मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करा', असं लिहिलेलं असतं.
स्पॅम मेसेजमधील लिंकवर क्लिक करताच तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक डिटेल्स सायबर गुन्हेगारांना मिळतात आणि ते तुमची फसवणूक करतात.
गुगलच्या माहितीनुसार, अँड्रॉइडची सुरक्षा प्रणाली महिन्याला कोट्यवधी स्पॅम कॉल्स, मेसेज आणि GMail थांबवते. तरीही, हॅकर्स फसवणुकीच्या नवनवीन पद्धती शोधतात.
त्यामुळे अँड्रॉइडची सुरक्षा मजबूत असली तरीही वापरकर्ते पूर्ण सुरक्षित नसल्याचं गुगलने स्पष्ट केलंय.
त्यामुळे तुम्ही कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद नंबरवरून आलेल्या मेसेजला रिप्लाई न देता तो लगेच डिलीट करण्याचा सल्ला अमेरिकेच्या 'FBI'ने दिला आहे.
तरीही चुकून या लिंकवर क्लिक केल्यास लगेच तुमचं बँक अकाऊंट चेक करा. ऑनलाइन खात्यांचे पासवर्ड बदला तसंच सायबर क्राइम विभागाकडे तक्रार नोंदवा.